माहिती तंत्रज्ञान विभाग आणि महा आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक महा इम्पॅक्ट 2026’ या राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
या परिषदेत महाराष्ट्राच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित विकास मॉडेलवर विशेष भर देण्यात आला. डिजिटल समावेशन, ई-गव्हर्नन्स, CSR, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासंदर्भातील विविध विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात आली.
राज्यातील नागरिकांना सरकारी सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर परिषदेत भर देण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला आणि शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवण्यावरही विविध सत्रांमध्ये चर्चा झाली.
कृषी क्षेत्रात AIच्या वापराबाबतही परिषदेत माहिती देण्यात आली. हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, उत्पादन वाढ आणि संसाधनांचा प्रभावी वापर यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बारामतीमध्ये ऊसासह विविध पिकांच्या लागवडीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहितीही परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, CSRच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या AI Labs उपक्रमाचीही परिषदेत चर्चा झाली. या उपक्रमासाठी Microsoft आणि University of Oxford यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.
परिषदेदरम्यान विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तसेच ई-गव्हर्नन्स मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. महाराष्ट्रात तंत्रज्ञानाधारित आणि लोककेंद्रित विकासाला चालना देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.