पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल पुणे जिल्ह्यातील व शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दिवसभर सखोल बैठक घेतली. या बैठकीमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनोबल मोठ्या प्रमाणात उंचावल्याचे दिसून आले.
दिवसभर सुरू असलेल्या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील पक्षाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील आमदार, जिल्हापरिषद सदस्य, महानगरपालिका नगरसेवक, आणि आजी माजी पदाधिकारी या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विविध तालुका आणि विभागनिहाय प्रगती, सुरू असलेले उपक्रम आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. काही ठिकाणी कामकाजात असलेल्या उणिवांवरही स्पष्टपणे बोट ठेवत त्या दुरुस्त करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांच्याकडून देण्यात आल्या.
यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठोस कार्यपद्धती तयार करणेच्या सूचना देण्यात आल्या. बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्याचे निर्देश देत, प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहून जनसंपर्क वाढवावा, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेण्यात आल्या. स्थानिक पातळीवरील समस्या, संघटनात्मक अडथळे आणि जनतेच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात आले.
या बैठकीमुळे पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी काळात अधिक जोमाने काम करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून एक सक्षम नेतृत्व पुढे येत असल्याचे अनेक पदाधिकारी यांनी सांगितले.