Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; अधिकारी वापरणार सार्वजनिक वाहतूक

आखातातील तणाव आणि इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने अधिकाऱ्यांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला असून, आठवड्यातून किमान एकदा सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नितीन कुलकर्णी
23 May 2026, 12:14 PM
10,655 वाचले
News Image

पुणे महापालिका प्रशासनाने इंधन बचतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अधिकाऱ्यांच्या वाहन वापरावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असताना, इंधनाचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना सुरू केली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अधिकाऱ्यांनी वाहनांचा वापर मर्यादित ठेवावा तसेच आठवड्यातून किमान एकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.

यासोबतच प्रकल्प पाहणी किंवा अधिकृत दौऱ्यांसाठी जाताना अनेक अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहनांचा वापर न करता एकाच वाहनातून प्रवास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इंधनाचा अनावश्यक वापर टाळणे आणि खर्चात बचत करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. त्यानंतर विविध राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनांनीही इंधन बचतीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील इंधन बचतीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर पुणे महापालिकेने ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला चालना मिळण्याबरोबरच प्रशासनात इंधन बचतीबाबत जागरूकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.