Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षांतील ही त्यांची 25 वी बदली असून प्रशासनात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

नितीन कुलकर्णी
21 May 2026, 03:55 PM
12,336 वाचले
News Image

वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रतीक्षा अखेर संपली असून त्यांची अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य सरकारकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या 21 वर्षांत त्यांची ही तब्बल 25 वी बदली ठरली आहे.

प्रशासनातील कडक शिस्त, थेट निर्णयशैली आणि निर्भीड भूमिकेमुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेकदा वादही निर्माण झाले होते. आता त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी असतानाही त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने प्रशासनात विविध चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते ही पदावनती मानली जात असली तरी, अन्न व औषध प्रशासन विभागातील कारभार अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात औषध विक्री, अन्न सुरक्षा, बनावट उत्पादनांवर कारवाई आणि विविध परवान्यांशी संबंधित कामकाज पाहिले जाते. या विभागात अनेकदा गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या तक्रारी समोर येत असल्याने, मुंढे यांच्या नियुक्तीकडे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत त्यांचे प्रशासकीय समन्वय कसा राहणार याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

अवघ्या 45 दिवसांत नवीन पोस्टिंग मिळाल्याने तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या पुढील निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.