रोहित पवारांची धडपड की आदळआपट? उथळ पाण्याला खळखळाट फार …!!
बारामती: राज्याच्या राजकारणात सध्या वारसदाराच्या चर्चांना जोर आला असून, रोहित पवार यांच्या हालचालींमुळे नवा राजकीय अर्थ लावला जात आहे. बारामती परिसरात वाढलेले दौरे, विविध राजकीय कार्यक्रम, दररोज होणारे स्टंट, आवश्यक नसलेली आंदोलने आणि कार्यकर्त्यांशी वाढता संपर्क यामुळे त्यांची धडपड ही केवळ संघटन बळकट करण्यासाठी आहे की अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून स्वतःचे नाव पुढे आणण्याचा केविलवाना प्रयत्न आहे यावर बारामती तालुक्यात चर्चा रंगत आहे.
गेल्या चार महिन्यांपासून रोहित पवार यांची उपस्थिती तालुक्यातील ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत वाढली आहे.विविध उपक्रमांची आखणी, सातत्याने सोशल मीडियावर सक्रियता, अजित दादांच्या मृत्यूचे राजकारण, स्टंटबाजी आणि राष्ट्रीय नेता होण्याची धडपड यामुळे त्यांनी स्वतःचे वेगळे नाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, विरोधकांच्या मते ही धडपड काही प्रमाणात “आदळआपट” व स्टंट वाटत असून, त्यामागे स्पष्ट राजकीय अजेंडा दिसत असल्याची टीका केली जात आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पुढील पिढीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत रोहित पवार यांची उथळ पाण्याला खळखळाट फार या उक्तीप्रमाणे त्यांची शैली सातत्यपूर्ण पुढे येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते मात्र या सर्व हालचालींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असून, नव्या पिढीने पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आहेत. पण सर्वसामान्य बारामतीकरांना मात्र रोहित पवारांची ही धडपड केवळ अजितदादांचे वारसदार होण्यासाठी आणि अजितदादांनी उभ्या केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आहे असे मत व्यक्त करीत आहेत.