समुद्रकिनारे, कोकणातील निसर्गसौंदर्य आणि वीकेंड पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागला जाणाऱ्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) स्वारगेट ते अलिबाग या मार्गावर नियमित बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
या सेवेअंतर्गत बस स्वारगेट, कात्रज, लोणावळा, खोपोली, पेण मार्गे अलिबाग येथे पोहोचते. प्रवासाचा कालावधी सुमारे ३ तास ३० मिनिटांचा असून प्रवाशांना आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
स्वारगेट बस स्थानकातून सकाळी आणि दुपारच्या वेळेत विविध फेऱ्या उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी साध्या बससह इलेक्ट्रिक बसचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. साध्या बसचे तिकीट २८४ रुपये तर इलेक्ट्रिक बसचे तिकीट ३४९ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
पावसाळी पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांवरील सहल आणि कोकण सफरीसाठी अलिबाग हे पुणेकरांचे आवडते ठिकाण मानले जाते. त्यामुळे खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीची ही थेट सेवा अनेक प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.
दरम्यान, सुट्टीच्या दिवसांत आणि वीकेंडला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.