सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १) चोख पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे ९७ टक्के मतदानाची नोंद झाली. कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लक्ष ठेवले. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात व राहुल देशमुख यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यंत्रणेचे नियोजन आणि पोलिस बंदोबस्तामुळे जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मतदानानंतर सर्व तालुक्यांतील मतपेट्या जरंडेश्वर नाक्यावरील हनुमान मंदिराजवळ असलेल्या सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहातील मतमोजणी केंद्रात आणण्यात आल्या. त्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणि पोलिस बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
मतमोजणी मंगळवारी (ता. ३) सकाळी आठ वाजता याच केंद्रावर सुरू होणार आहे. सहा टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींसमोर मतपेट्या उघडल्या जातील. सुरुवातीला मतपत्रिका मतदारसंघनिहाय वेगळ्या करून त्यांचे गठ्ठे तयार केले जातील. त्यानंतर प्रथम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाची, तर पुढे राखीव आणि औद्योगिक मजूर मतदारसंघांची मतमोजणी होईल.
मतमोजणी केंद्रात केवळ निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिनिधींसाठी विहित नमुन्यातील ८-अ अर्ज मतमोजणीपूर्वी दाखल करणे आणि ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे. निकाल प्रक्रियेत गोंधळ होऊ नये म्हणून परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.