महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी, जलसाठे आणि शेती क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या परिस्थितीची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी युवानेते जय अजितदादा पवार यांनी आज मुंबई येथील Regional Meteorological Centre (RMC) ला भेट देत हवामान तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या भेटीत मान्सूनच्या विलंबामागील कारणे, आगामी हवामानाचा अंदाज, पर्जन्यमानाची शक्यता आणि त्याचा शेती व जलसाठ्यांवर होणारा परिणाम यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
यावेळी RMC मधील Scientist-G श्री. बिक्रम सिंग यांनी जय पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. त्यानंतर Scientist-E डॉ. नायर, Scientist-D सौ. निथा, Scientist-C डॉ. जिस्मी तसेच Meteorologist-B श्री. योगेश यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. हवामानातील बदल, समुद्रातील तापमान, वातावरणातील दाब प्रणाली तसेच एल निनो (El Niño) यांसारख्या जागतिक हवामान घटकांचा महाराष्ट्रातील मान्सूनवर होणारा परिणाम यावर विशेष मंथन करण्यात आले.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात खंड पडला असला तरी येत्या २५ जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सूनच्या विलंबामुळे अनेक भागांतील शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. याच पार्श्वभूमीवर जय पवार यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन करत, पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे सांगितले.
जय पवार म्हणाले की, “राज्यातील शेतकरी, शेती, जलसाठे आणि सर्वसामान्य जनजीवनासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीचा अचूक आढावा घेणे आणि तज्ज्ञांकडून वस्तुनिष्ठ माहिती मिळवणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत हवामान विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून अद्ययावत माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल.”
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी तसेच तथ्याधारित माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जय पवार यांनी घेतलेला हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. हवामानातील बदलांचा थेट परिणाम शेती, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, धरणे आणि जलसाठ्यांवर होत असल्याने अशा विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने मान्सूनविषयीची अचूक माहिती मिळवण्यासाठी जय पवार यांनी केलेली ही भेट विशेष महत्त्वाची ठरत असून, शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी दिलासादायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.