ऑक्टोबरमधील उकाड्यानंतर राज्याच्या काही भागांत पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात आणि दक्षिण आंध्र प्रदेश-तमिळनाडू किनारपट्टीजवळ चक्राकार वारे सक्रिय आहेत. या प्रणालींसह इतर हवामान घटकांमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.
किनारपट्टीच्या भागांतही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी, तर दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर विखुरलेल्या पावसाचा अंदाज दिला आहे.
वादळी हवामानाच्या वेळी झाडांखाली किंवा उघड्या जागेत थांबू नये. स्थानिक हवामान सूचना आणि प्रशासनाच्या सूचनांनुसार खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.