Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

बारामतीच्या प्रश्नांसाठी पहाटेच सज्ज; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची प्रत्यक्ष पाहणी

बारामतीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पहाटेच प्रत्यक्ष पाहणी केली. पडलेली झाडे, वाहतुकीतील अडथळे आणि पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

नितीन कुलकर्णी
07 Jun 2026, 01:42 PM
15,441 वाचले
News Image

बारामती शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले, तर काही भागांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आज पहाटेच विविध भागांना भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

क्रीडा संकुल ते जवाहर पार्क परिसरासह शहरातील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी पडलेल्या झाडांची, सुरू असलेल्या कामांची आणि प्रशासनाच्या उपाययोजनांची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्ते मोकळे करणे, वाहतूक सुरळीत करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यावर विशेष भर देण्यात आला.

या पाहणीदरम्यान सुनेत्राताई पवार यांनी पर्यावरण संवर्धनालाही तितकेच महत्त्व दिले. वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या वृक्षांचे केवळ हटविणे न करता त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही हाती घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पर्यावरणाचा समतोल राखत विकासाचा मार्ग स्वीकारणे हीच बारामतीची ओळख असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

बारामतीच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीची पाहणी करण्याची परंपरा राहिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनेक वर्षे पहाटेच कामांची सुरुवात करत विकासकामांचा आणि प्रशासनाचा आढावा घेण्याची कार्यशैली जपली. कोणतेही संकट असो किंवा विकासकामांची पाहणी, अजितदादा अनेकदा सूर्योदयापूर्वीच रस्त्यावर उतरलेले बारामतीकरांनी पाहिले आहेत. जनतेच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची ही कार्यपद्धती बारामतीच्या विकास मॉडेलचा महत्त्वाचा भाग मानली जाते.

आजच्या पाहणी दौऱ्यात सुनेत्राताई पवार यांच्यामध्येही त्याच कार्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळाली. कार्यालयीन अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेणे, प्रशासनाला जागेवरच सूचना देणे आणि कामांच्या प्रगतीचा आढावा घेणे या माध्यमातून त्यांनी नागरिकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.

बारामतीतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मदत आणि पुनर्स्थापना कामांची माहिती घेताना त्यांनी जनजीवन शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले. नुकसानग्रस्त भागांतील प्रत्येक प्रश्नावर प्रशासनाने तत्परतेने लक्ष द्यावे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीने विकासासोबतच पर्यावरण, नियोजन आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटांच्या काळातही त्याच संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, “बारामतीकरांना कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समस्या वेळेत मार्गी लागावी यासाठी माझं सातत्यानं लक्ष आहे. बारामतीकरांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”