देशभरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारक आणि प्रवाशांसाठी काही सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. अनेक ग्राहकांना या अधिकारांची माहिती नसल्यामुळे काही ठिकाणी त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. मात्र नियमांनुसार अशा मूलभूत सुविधांसाठी कोणतेही शुल्क घेता येत नाही.
इंधनाची गुणवत्ता आणि प्रमाण तपासण्याचा अधिकार
ग्राहकांना पेट्रोल किंवा डिझेलची गुणवत्ता आणि प्रमाण तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंधनाच्या शुद्धतेसाठी ‘फिल्टर पेपर टेस्ट’ केली जाऊ शकते. तसेच पेट्रोल किंवा डिझेलचे योग्य प्रमाण दिले जात आहे की नाही, हे तपासण्याची सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध असते. यासाठी पेट्रोल पंप चालक कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत.
प्रथमोपचार पेटीची सुविधा
प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक उपचार देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
आणीबाणीच्या वेळी फोन कॉल सुविधा
मोबाईलची बॅटरी संपल्यास किंवा फोन बंद असल्यास ग्राहकांना पेट्रोल पंपावरील फोन वापरण्याची सुविधा दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत मदत उपलब्ध करून देणे ही पंप कर्मचाऱ्यांची जबाबदारी मानली जाते.
स्वच्छ आणि मोफत प्रसाधनगृह
प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वच्छ प्रसाधनगृह असणे अनिवार्य आहे. ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहक असणे आवश्यक नाही. कोणताही प्रवासी किंवा नागरिक मोफत प्रसाधनगृह वापरू शकतो.
पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा
पेट्रोल पंपांवर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. प्रवासी येथे पाणी पिऊ शकतात तसेच बाटलीमध्ये पाणी भरून घेऊ शकतात.
टायरमध्ये मोफत हवा
वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. पेट्रोल किंवा डिझेल भरले नसले तरीही ग्राहकांकडून हवा भरण्यासाठी पैसे मागता येत नाहीत.
तक्रार कुठे कराल?
जर कोणत्याही पेट्रोल पंपावर या सुविधा नाकारल्या गेल्या किंवा त्यासाठी पैसे मागितले गेले, तर ग्राहक तक्रार करू शकतात.
pgportal.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.
संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येतो.
प्रत्येक पेट्रोल पंपावर तक्रार नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे.
वाहनधारकांनी आपल्या अधिकारांची माहिती ठेवून आवश्यक सुविधा मोफत मिळत आहेत का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.