Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

नांदेड-सावंतवाडी विशेष रेल्वेची घोषणा; कोकणासाठी पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेडहून सावंतवाडी रोडपर्यंत विशेष रेल्वे धावणार आहे. या सेवेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे.

नितीन कुलकर्णी
09 Sep 2026, 01:17 PM
11,909 वाचले
News Image

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नांदेडहून सावंतवाडी रोडपर्यंत विशेष रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नांदेडसह परिसरातील प्रवाशांना कोकणासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून 07659 आणि 07660 या क्रमांकाच्या विशेष गाड्या दोन फेऱ्यांसाठी चालवण्यात येणार आहेत. नांदेडहून ही विशेष रेल्वे १२ आणि १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोडहून १४ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता विशेष रेल्वे सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता नांदेडला पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेला एकूण २४ डबे असणार आहेत.

या रेल्वेचा मार्ग नांदेड, पूर्णा जंक्शन, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येरमाळा, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळ मार्गे सावंतवाडी रोड असा असणार आहे.

गणेशोत्सव आणि गौरी सणासाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. त्यामुळे या काळात रेल्वे आणि बससेवेवर मोठा ताण निर्माण होतो. थेट विशेष रेल्वे उपलब्ध झाल्याने नांदेडसह विविध स्थानकांवरील प्रवाशांना कोकण प्रवासासाठी पर्याय मिळणार आहे.

कोकणासाठी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून पाठपुरावा करण्यात आला होता. खासदारांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी मांडली होती.

आता विशेष रेल्वेची घोषणा झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, ही सेवा सध्या केवळ दोन फेऱ्यांसाठी असल्याने भविष्यात या मार्गावर नियमित रेल्वेसेवा सुरू होते का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.