बारामती - "घराची भांडणे चार भिंतीत असावीत" - स्वर्गीय अजित दादा पवारांचे शेवटचे आर्जव. पण ज्यांनी तेव्हा हे आर्जव धुडकावले, ज्यांनी उघड विरोध केला, ज्यांना सुज्ञ बारामतीकरांनी १,००,८९९ मतांच्या प्रचंड फरकाने सपशेल नाकारले, तेच आज त्यांच्याच फोटोला हार घालत बारामतीच्या गल्लीबोळात फिरत आहेत! जिवंतपणी ज्यांना सलामीचीही लाज होती, त्यांच्या मरणानंतर अचानक "श्रद्धांजलीचा पूर" आला आहे. हा कसला हृदयपरिवर्तन, हा कसला अचानक झालेला कायापालट? बारामतीकर एकच विचारतायेत - "गरज होती तेव्हा कुठे गायब होते?""जे लोक काल विरोधक होते, ते आज वारस कसे झाले?" असा थेट सवाल आता गावच्या पारावर खुलेआम विचारला जात आहे. वयोवृद्ध शेतकरी, युवा कार्यकर्ते, सामान्य गृहिणी - सर्वच या दुटप्पी "श्रद्धांजली राजकारणावर" नाराज आहेत.
."जखमा देणारे आता मलमपट्टी करायला आले" अशी मार्मिक प्रतिक्रिया एका ज्येष्ठ बारामतीकराने व्यक्त केली. कारण बारामतीने अजित दादांचा प्रत्येक संघर्ष जवळून पाहिला आहे, त्यांच्या ४० वर्षांच्या कष्टातून उभा राहिलेला विकास अनुभवला आहे. आज त्याच विकासावर "बाहेरून येऊन" हक्क सांगणाऱ्यांना बारामती चांगलेच ओळखून आहे. "आयत्या बिळावर नागोबा" - मराठीतली ही सार्थ म्हण आज बारामतीत चपखल बसत आहे. ज्यांनी कधी रक्ताचे पाणी केले नाही, ते आज दुसऱ्याच्या कष्टावर सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. दादांच्या स्वप्नांचा खरा वारसा बारामतीने आधीच ओळखला आहे.