तापी, पूर्णा आणि गिरणा नद्यांच्या सुपीक खोऱ्यात वसलेल्या जळगाव जिल्ह्याने केळी, कपाशी, सोन्यासाठीच नव्हे तर सातपुड्याच्या कुशीत असलेल्या अनेक ऐतिहासिक किल्ले आणि भुईकोटांच्या माध्यमातून आपली ओळख जपली आहे. जळगाव जिल्ह्यातील किल्ल्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे गिरीदुर्ग आणि भुईकोट अशा दोन्ही प्रकारच्या स्थापत्यकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. सातपुडा आणि सातमाळा पर्वतरांगांमध्ये गिरीदुर्ग वसलेले आहेत, तर तापी, गिरणा नद्यांच्या सुपीक मैदानी प्रदेशात भुईकोट, नगरकोट आणि गढ्या आहेत.
पारोळा तालुक्यात बसस्थानकाजवळ असलेल्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूंनी तटबंदी आणि सात दरवाजे आहेत, ज्यातील दिल्ली दरवाजा मुख्य आहे. बालेकिल्ला मध्यभागी असून त्याला चार भव्य बुरूज आहेत आणि किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, तसेच हा किल्ला जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला आहे. चाळीसगाव तालुक्यातील गवताळा अभयारण्यात सातमाळा डोंगररांगेत कन्हेरगड हा महत्त्वाचा गिरीदुर्ग वसलेला असून तिथे पाण्याचे टाके, पायऱ्या आणि प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात.
पारोळा आणि अमळनेर शहरांच्या मध्यभागी बोरी नदीच्या काठावर बहादरपूरचा भुईकोट वसलेला आहे, जो बहादूरखान सूरी याने बांधल्याचा उल्लेख मिळतो. मराठेशाही आणि पेशवेकाळात हा किल्ला लष्करी छावणी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्वाचा ठरला असून येथील विशाल बुरूज आणि उंच तटबंदी आजही पर्यटकांचे नजर वेधून घेतात. स्थानिक लोकांच्या मते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर पारोळ्याचे असून तांबे घराणे आजही तिथे राहते.
या ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सध्या सुरू असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. पाटणादेवी मंदिर आणि गणिताचार्य भास्कराचार्य यांचे कर्मस्थान यामुळे या परिसराला ऐतिहासिक व आध्यात्मिक ओळख प्राप्त झाली आहे. पुढील काळात या वास्तूंच्या जतनामुळे इतिहासप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने याभागात भेट देणार आहेत.