Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

घरगुती ग्राहकांना दिलासा; LPG कनेक्शन परत करण्याची सक्ती हटली

केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेत LPG नियमांमध्ये बदल केले आहेत. आता PNG कनेक्शन घेतल्यानंतर ग्राहकांना LPG सिलेंडर कनेक्शन परत करण्याची सक्ती राहणार नाही.

नितीन कुलकर्णी
26 May 2026, 05:57 PM
11,725 वाचले
News Image

घरगुती एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने LPG पुरवठा आणि वितरण नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. 25 मे 2026 रोजी केंद्र सरकारने “लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस सुधारणा आदेश 2026” अधिसूचित करत नवीन नियम लागू केले आहेत.

नवीन नियमांनुसार, ज्या ग्राहकांनी PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) कनेक्शन घेतले आहे, त्यांना आता आपले LPG कनेक्शन कायमस्वरूपी परत करण्याची सक्ती राहणार नाही. म्हणजेच ग्राहकांना आवश्यकतेनुसार PNG आणि LPG या दोन्ही सुविधा वापरण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.

यापूर्वी अनेक ठिकाणी PNG कनेक्शन घेतल्यानंतर LPG कनेक्शन बंद करण्याचा किंवा सिलेंडर परत करण्याचा दबाव ग्राहकांवर येत होता. मात्र आता केंद्र सरकारने ग्राहकांच्या सोयीचा विचार करून नियमांमध्ये बदल केला आहे.

सरकारच्या मते, या निर्णयामुळे ग्राहकांना अधिक लवचिकता मिळेल. आपत्कालीन परिस्थिती, गॅस पुरवठ्यातील अडचणी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे PNG सेवा खंडित झाल्यास ग्राहक LPGचा पर्याय वापरू शकतील.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत आहे. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर आणि प्रतीक्षा कालावधीवर दबाव येऊ नये म्हणून सरकार नागरिकांना PNG कनेक्शन स्वीकारण्यास प्रोत्साहन देत आहे.

काही दिवसांपूर्वी सरकारने PNG कनेक्शन अर्जांवर सात दिवसांच्या आत प्रक्रिया करण्याचे निर्देशही दिले होते. तसेच PNG वापर वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे शहरी भागातील ग्राहकांना मोठा फायदा होऊ शकतो. विशेषतः ज्या कुटुंबांकडे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील, त्यांना इंधन पुरवठ्याबाबत अधिक सुरक्षितता आणि सोय मिळणार आहे.