गणेशोत्सवाच्या उत्साहाला आता महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची जोड मिळणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर पुण्यात प्रथमच ‘राज्य सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ सप्टेंबर या तीन दिवसांत शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेली ढोल-ताशांची परंपरा, मराठी साहित्य-काव्य आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला एका मंचावर पाहायला मिळणार आहे. महोत्सवाचे संयोजन कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने करत असून, आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
१६ सप्टेंबर रोजी ‘नादविष्कार’ या कार्यक्रमातून पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण होणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवातील ढोल-ताशा संस्कृतीचा अनुभव या कार्यक्रमातून घेता येणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी ‘कणक — अक्षर अक्षर तुझेच आहे’ या विशेष काव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी कविता, शब्द आणि भावनांचा आविष्कार या कार्यक्रमातून सादर केला जाणार आहे.
१८ सप्टेंबर रोजी ‘Folk लोक — महाराष्ट्राच्या लोककलेचा जल्लोष’ हा कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला, लोकसंगीत आणि लोकपरंपरांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या या महोत्सवात पुणेकरांना महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक रूपांचा अनुभव घेता येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर पुण्यात प्रथमच होत असलेल्या या सांस्कृतिक उपक्रमामुळे गणेशोत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना एका व्यापक मंचावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कार्यक्रमांकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.