Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

कॅन्सर उपचारांच्या खर्चाला दिलासा? १३७ औषधांच्या विक्री मार्जिनवर सरकारचे नियंत्रण

औषधांच्या किंमतीतील अवाजवी वाढ रोखण्यासाठी केंद्राने १३७ गैर-अनुसूचित कर्करोग औषधांच्या व्यापार मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा आणली आहे. सुधारित दर ९ नोव्हेंबरपासून लागू होतील.

नितीन कुलकर्णी
18 Oct 2026, 06:34 PM
10,399 वाचले
News Image

कर्करोगाच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) १३७ गैर-अनुसूचित कर्करोग औषधांच्या व्यापार मार्जिनची कमाल मर्यादा ३० टक्के निश्चित केली आहे. औषधांचे सुधारित दर ९ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत.

या बदलामुळे काही औषधांच्या कमाल किरकोळ किमतीत ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र, प्रत्येक औषधासाठी किंमतकपात सारखी नसेल. औषधाची सध्याची किंमत आणि तिची रचना यावर प्रत्यक्ष दर ठरणार आहेत.

निर्मात्यांना सुधारित किंमती NPPA कडे कळवाव्या लागतील. नवे दर लागू झाल्यानंतर औषध खरेदी करताना ग्राहकांनी पॅकवरील कमाल किरकोळ किंमत तपासणे गरजेचे आहे.

व्यापार साखळीतील मार्जिनला मर्यादा घालून रुग्णांचा औषधांवरील खर्च कमी करणे हा निर्णयाचा उद्देश आहे. किंमतीतील नेमका बदल सुधारित दर जाहीर झाल्यावर स्पष्ट होईल.