बारामती दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत होत्या. सहयोग निवासस्थानी आयोजित जनसंपर्क भेटीदरम्यान एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. दोन चिमुकले आपल्या वडिलांसोबत सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी आले आणि हरवलेल्या आपल्या आईचा शोध लावून द्यावा, अशी आर्त विनंती त्यांनी केली.
लहान मुलांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या आवाजातील वेदना पाहून उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. “आमच्या आईला शोधून द्या” अशी विनंती करत या चिमुकल्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मुलांचे दुःख ऐकून सुनेत्रा पवारही भावूक झाल्या. त्यांनी मुलांना जवळ घेत आपुलकीने त्यांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांना तात्काळ हरवलेल्या महिलेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला दिले. तसेच मुलांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि कुटुंबाला आवश्यक असलेल्या मदतीबाबतही संवेदनशील भूमिका घेतली.
सहयोग निवासस्थानी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भेटीत अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र या दोन चिमुकल्यांच्या आर्त हाकेमुळे वातावरण काही काळ भावूक झाले. उपस्थित नागरिकांनीही या प्रसंगानंतर मुलांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
समाजातील दुर्बल आणि अडचणीत असलेल्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याची गरज अधोरेखित करत सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या घटनेनंतर परिसरातही मोठी चर्चा रंगली असून, हरवलेल्या महिलेचा लवकरात लवकर शोध लागावा अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.