Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
महाराष्ट्र

अधिक मासानिमित्त पंढरीत भक्तांची गर्दी; VIP दर्शन पूर्णपणे थांबवले

अधिक मासानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नितीन कुलकर्णी
26 May 2026, 05:40 PM
12,167 वाचले
News Image

श्री विठ्ठल रुक्मीिणी मंदिर येथे अधिक मासानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत VIP दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दर्शन रांग आणि मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांग वॉटरप्रूफ करण्यात आल्याने पाऊस किंवा उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होत आहे.

भाविकांना शांततेत, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. वाढत्या गर्दीमुळे सामान्य भाविकांना अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हाधिकारी यांनी मंदिर प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद् sशेळके यांनी दिली.

यामुळे आता सर्व भाविकांना समान रांगेतून दर्शन घ्यावे लागणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे अनेक भाविकांकडून स्वागत करण्यात येत असून सर्वसामान्य भक्तांना अधिक सुलभ दर्शन मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात आला आहे. पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस पंढरपुरात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.