Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
मनोरंजन

भाजपला मत दिलं नाही म्हणून गावाचं पाणी बंद? गुजरातमधील धक्कादायक प्रकार

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात पंचायत निवडणुकीतील पराभवानंतर गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, दोन दिवस गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.

नितीन कुलकर्णी
22 May 2026, 01:25 PM
11,729 वाचले
News Image

गुजरात मधील वलसाड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर संतप्त झालेल्या एका स्थानिक भाजप कार्यकर्त्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुमारे 700 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना दोन दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागली.

ही घटना दादरा आणि नगर हवेली सीमेजवळील गढवी गावातील तबाडमाल फलिया भागात घडली. हा आदिवासीबहुल भाग असून संपूर्ण वस्तीसाठी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या एका सरकारी बोरवेलवर गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी झालेल्या कपराडा तालुका पंचायत निवडणुकीत भाजपला 18 जागांवर विजय मिळाला, तर काँग्रेसने 4 जागा जिंकल्या. मात्र गढवी गावात काँग्रेसच्या उमेदवार मनीषा गोंड यांनी भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव केला. या निकालानंतर स्थानिक भाजप कार्यकर्ता अमरेश तुलजी बुधल याने 17 मे रोजी गावकऱ्यांना सरकारी बोरवेलवरून पाणी भरण्यास मनाई केल्याचा आरोप आहे.

पाणीपुरवठा बंद झाल्याने गावातील महिलांना उन्हातानात दूरवरून पाणी आणावे लागले. दोन दिवस गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी या प्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सरकारी यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.

दरम्यान, गढवी गावचे सरपंच बापू खारप्रदे यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप आमदार जितू चौधरी यांनी संबंधित कार्यकर्त्याला फटकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी कार्यकर्त्याने प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगितले जात आहे.

सरकारी हस्तक्षेपानंतर अखेर दोन दिवसांनी गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक राजकारण आणि मूलभूत सुविधांवरून सुरू झालेल्या वादाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.