Saturday, 27 June 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
मनोरंजन

चंद्रपूरमध्ये वाघिणीचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 4 महिलांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने हल्ला केला. या घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नितीन कुलकर्णी
22 May 2026, 01:11 PM
3,581 वाचले
News Image

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी भीषण घटना घडली. गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने अचानक हल्ला चढवल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला असून, इतर महिलांनी जीव वाचवण्यासाठी जंगलात सैरावैरा पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 13 महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळच्या सुमारास गुंजेवाही जंगलात गेल्या होत्या. महिलांनी जंगलात काम सुरू केले असताना अचानक वाघीण त्यांच्या दिशेने आली आणि हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच घबराट उडाली.

हल्ल्यादरम्यान काही महिलांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर काहींना वाघिणीपासून बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या भीषण घटनेत चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, नागरिकांना जंगल परिसरात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगतच्या भागात वारंवार वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढत असल्याने स्थानिक नागरिकांकडून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.