नवी दिल्ली - तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनी २७ मे रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेवा तीर्थ या कार्यालयात भेट घेतली. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ही त्यांची पहिलीच अधिकृत दिल्ली भेट असून या भेटीने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विजय यांनी ब्लॅक ब्लेझर, व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशा साध्या फॉर्मल वेशभूषेत पंतप्रधानांना भेटायला पोहोचले आणि फुलांचा बुके देऊन त्यांचे स्वागत केले.
या भेटीत मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. श्रीलंकेच्या नौदलाकडून तमिळनाडूच्या मच्छिमारांना वारंवार अटक होत असून सध्या ५८ मच्छिमार श्रीलंकेच्या ताब्यात आहेत आणि २६६ बोटी जप्त आहेत. त्यांच्या तातडीने सुटकेसाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी आग्रही मागणी विजय यांनी केली.
कर्नाटकच्या मेकेदातु धरण प्रकल्पावर तीव्र चिंता व्यक्त करत हा प्रकल्प कावेरी लवाद आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांविरुद्ध असल्याचे सांगत तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीच्या संमतीशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली. तसेच तमिळनाडूमध्ये डीआरडीओचे सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टम्स सुरू करण्याची विनंती केली. नेदरलँड्समधून ऐतिहासिक अनाईमंगलम ताम्रपट परत आणण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या मदतीबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले.
जाणकारांच्या मते ही भेट केंद्र आणि तमिळनाडूच्या नव्या सरकारमधील संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री विजय हे यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचीही भेट घेणार आहेत.