गुवाहाटी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावाची साक्ष देणारा क्षण आज गुवाहाटी विमानतळावर पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची फौज गुवाहाटीत दाखल झाली. विमानतळावर कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण आणि जंगी स्वागत केले.
सुनेत्रा ताई पवार यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, खासदार पार्थ पवार तसेच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांचे आगमन झाले. महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांच्या एकत्रित उपस्थितीने पक्षाची संघटनात्मक एकजूट आणि राष्ट्रीय विस्ताराची दिशा स्पष्ट केली.
विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, आसाम प्रदेश युवक अध्यक्ष अनुपल दास तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या जयघोषाने आणि अभूतपूर्व उत्साहाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीत नेत्यांचे स्वागत करण्यात आले.
आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या भाजपा-एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. एनडीए परिवारातील एकजूट आणि सामायिक दृष्टिकोनाचे दर्शन या निमित्ताने घडले.
राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर सुनेत्रा ताई पवार यांचा हा महत्त्वाचा पूर्वोत्तर भारत दौरा मानला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली अशा राज्यांत पक्षाचे जाळे विस्तारण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आता पूर्वोत्तर भारतात पक्ष विस्ताराचा नवा अध्याय सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, आसामचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैचारिक परंपरेशी जोडलेले स्वर्गीय शरदचंद्र सिन्हा यांच्या भूमीत हा विस्तार सुरू होत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. युवा कार्यकर्त्यांचा उत्साह, संघटनात्मक मजबुती आणि वैचारिक स्पष्टता या तीन गोष्टींच्या आधारे पक्षाचा पूर्वोत्तरातील प्रवास आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.