Wednesday, 04 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
राजकारण

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा बिगुल! विधान परिषदेच्या 16 जागांसाठी मतदान

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे.

नितीन कुलकर्णी
18 May 2026, 11:53 AM
11,651 वाचले
News Image

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतर्गत विधान परिषदेच्या 16 जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची प्रक्रिया 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 1 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

दाखल झालेल्या अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 4 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

यानंतर 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून, निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर केले जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

या निवडणुकीकडे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार राजकीय सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.