Thursday, 05 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
गुन्हेगारी

सांगलीमध्ये व्यापाऱ्याचे कोयत्याच्या धाकाने अपहरण करून पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लुटला

सांगलीतील १०० फुटी रस्त्यावर एका व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लुटला.

me
05 Nov 2026, 07:16 AM
3,506 वाचले
News Image

सांगली शहरातील १०० फुटी रस्ता परिसर असणाऱ्या शांतीसागर कॉलनी भागात एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. २ नोव्हेंबर रोजी रातच्या वेळी दुचाकीवरून घरी जाणाऱ्या ५१ वर्षांच्या प्रशांत मधुकर रावळ यांना काही लोकांनी अडवले. चार अज्ञात लोकांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना गाडीत डांबले आणि मोठा दरोडा टाकला.

घरच्या जवळ पोहोचण्याआधीच विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी व्यापाऱ्याची वाट अडवली. त्यानंतर लागलीच चारचाकी गाडीतून आलेल्या इतर साथीदारांनी त्यांना मारहाण करत गाडीत टाकले. तोंडावर काळी पिशवी टाकून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चोरट्यांनी त्यांना शहरापासून १२ ते १५ किलोमीटर दूर असणाऱ्या एका निर्जन भागात नेले.

त्या ठिकाणी नेऊन व्यापाऱ्याच्या गळ्यातील ४ लाख ९४ हजार ४८८ रुपयांची सोन्याची साखळी आणि सोन्याचे पदक काढून घेतले. याशिवाय प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या २ सोन्याच्या अंगठ्या, ४० हजार रुपयांचा मोबाईल आणि २ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८७ हजार १८८ रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. लुटालूट केल्यानंतर व्यापाऱ्याला शेतात फेकून सर्व आरोपी पसार झाले.

या प्रकरणी पीडित व्यापाऱ्याने सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती दिली आहे. पोलिसांनी चार अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत.