Friday, 06 November 2026 Maharashtra, India
| Maharashtra, India
गुन्हेगारी

फलटणमध्ये चार हजारांची लाच घेताना वकील रंगेहात; पॅनेल विधिज्ञालाही ताब्यात

सातारा जिल्ह्यातील फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. न्यायालयीन कामात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर चार हजार रुपये स्वीकारताना खासगी वकिलाला पकडण्यात आले. पॅनेल विधिज्ञालाही ताब्यात घेण्यात आले.

नितीन कुलकर्णी
06 Nov 2026, 12:55 PM
2,741 वाचले
News Image

न्यायालयीन कामात मदत करण्याच्या नावाखाली लाच मागितल्याचा प्रकार फलटणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तसेच, या प्रकरणात संबंधित पॅनेल विधिज्ञालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नितीन विलासराव भोईटे (वय ४५, पॅनेल विधिज्ञ, फलटण तालुका विधी सेवा समिती) आणि अजिम सलीम मेटकरी (वय ३४, वकील, रा. गोळीबार मैदान, फलटण) अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याचे दोषारोपपत्र फलटण न्यायालयात सादर करण्यात आले होते.

तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना विधी सेवा समितीकडून मोफत कायदेशीर मदत मिळण्यासाठी पॅनेल विधिज्ञ नितीन भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयीन कामकाजात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी झाल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

या तक्रारीची २ नोव्हेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी फलटण येथील जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीत सापळा रचण्यात आला. यावेळी अजिम मेटकरी यांनी नितीन भोईटे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले. त्यानंतर भोईटे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७, ७अ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईमुळे फलटणमधील न्यायालयीन वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.