शहागड भागामध्ये व्याजाच्या पैशांच्या वादातून एका तरुणाला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून विलास शिंदे या तरुणाने स्वतःचे जीवन संपवल्याचा गंभीर आरोप त्याच्या भावाने केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. फिर्यादी दीपक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मृत विलास शिंदे याला पाच जणांनी मिळून व्याजाच्या रकमेसाठी बेदम त्रास दिला होता. या प्रकरणात रामनाथ बेद्रे, पोपट धनगर, बन्शी गव्हाणे तिघे राहणार बेलगाव तालुका गेवराई, शुभम रोकडे राहणार गेवराई आणि उमेश गुंड राहणार नागझरी यांच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा सर्व प्रकार व्याजाच्या बेकायदेशीर व्यवहारातून घडल्याचे समोर आले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सदर प्रकरणाची नोंद पोलीस उपनिरीक्षक एस. एम. मुपडे यांनी करून घेतली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार फुलचंद हजारे करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या त्रासामुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याने पोलीस प्रशासनाने यावर कडक भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.
व्याजाच्या वाढत्या अवैध व्यवहारांमुळे आणि छळाच्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बघावा यासाठी नागरिकांनी आणि प्रशासनाने एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.