कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलिस किंवा इतर खात्यांचे विशेष अधिकारी असल्याचा बनाव करून महामार्ग तसेच ग्रामीण भागात वाटमारी करण्याचे प्रकार वाढले आहेत. शिरोळ आणि कुरूंदवाड रोडवरील नृसिंहवाडीजवळ असाच एक प्रकार घडला असून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटण्यात आले. जयसिंगपूर येथील अमृत खबाले (वय ६५, रा. संभाजीनगर) हे जात असताना दोन भामट्यांनी त्यांना रस्त्यात अडवले. एक्साईज अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांनी तपासणीच्या बहाण्याने ३ लाख रुपये किमतीचे दागिने लांबवले आणि तेथून पळ काढला.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारानंतर कुरूंदवाड पोलिस ठाण्यात अनोळखी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना घडून काही दिवस लोटले तरी पोलिसांना अद्याप संशयितांचा शोध लागलेला नाही. अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटना कोल्हापूर आणि कागल रोडवरील लक्ष्मी टेकडी, हातकणंगले आणि निमशिरगाव रोडवरील मजले खिंड, शिरोळ बायपास रोडवरील चौडेंश्वरी सूतगिरणीजवळ, राजाराम तलाव आणि शिवाजी विद्यापीठ परिसर तसेच पुणे-बंगळूर महामार्गावर घडत आहेत. विशेषतः रातच्या वेळी सराईत गुन्हेगार निर्जन रस्त्यांवर वाहनधारकांना गाठून दहशत निर्माण करत आहेत.
दुचाकीस्वारांचा पाठलाग करून त्यांची वाहने अडवली जातात आणि अधिकारी असल्याचे भासवून त्यांना मारहाण करून लुटले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी महामार्ग आणि ग्रामीण भागात रातच्या वेळी गस्त वाढवली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या सराईत टोळ्यांचा शोध लवकरात लवकर घेतला जावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. या प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी वेगाने तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी यंत्रणेने अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.