मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात असणाऱ्या जे. के. इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात २९ ऑक्टोबर रोजी रात ७.५० च्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील दोन तरुण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कायद्याचे पालन करून त्यांची झडती घेतली.
झडती घेतली असता ओमकार राजेंद्र पवार याच्याकडील लाल रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा सापडला. बाजारात या अमली पदार्थाची किंमत तब्बल ६६ लाख ३६ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. पकडलेले दोन्ही तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील रहिवासी आहेत, ज्यामध्ये ओमकार पवार आणि पियुष मधुकर घोंगडे यांचा समावेश आहे. हे दोघे मुंबईत हा अमली पदार्थ विकण्याच्या उद्देशाने आले होते अशी माहिती समोर आली आहे.
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अमली पदार्थ विरोधी पथक आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी गस्तीवर असताना हा प्रकार उघडकीस आला. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो हाणून पाडला गेला. एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांनुसार या दोन्ही आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करत असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. हे तरुण हा साठा कुठून घेऊन आले आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध अधिकारी घेत आहेत. पुढील तपासामध्ये मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे.